27गावे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
वाचला समस्यांचा पाढा
अमृत योजनेसह २७ गावातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार
पालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आश्वासन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील समस्या कायम असून या समस्याबाबत मंगळवारी संघर्ष समितीच्या वतीने पालिका आयुक्त गोयल यांची भेट घेतली. यावेळी २७ गावातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, पायवाटा, गटारे यासारख्या मुलभूत सोयीसुविधांबाबतचा पाढा आयुक्तांसमोर वाचत, आयुक्तांनी या भागातील दौरा करून समस्या समजावून घ्याव्यात अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी दौरा करण्या बरोबरच या मुलभूत समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.
या भागातील शाळा आणि आरोग्य सेवा जिल्हापरिषदेच्या नियंत्रणाखाली असल्याने या भागात सुविधा मिळत नसून शिक्षणाच्या सुविधा देखील अपुऱ्या असल्याने शाळा आणि आरोग्य सेवा पालिकेत समावून घेण्याची मागणी करण्यात आली. याबाबत शासन स्तरावर चर्चा करून पर्याय काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. तर सावळाराम म्हात्रे स्मारकासाठी जागा आणि निधी मंजूर करण्यात आल्याने स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील ४९९ कामगारांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून तो मार्गी लावण्या बरोबरच अमृत योजनेची मुदत उलटून गेली असली तरी पुढील चार ते पाच महिन्यात हि योजना कार्यान्वित करत या भागातील पाणी प्रश्न सोडविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे सकारात्मक आश्वासन आयुक्तांनी दिले. त्याचवेळी आता या भागाला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी समिती सदस्यांनी केली. याखेरीज मेट्रोच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी आणि नव्या कचर्याच्या ठेकेदाराने शहरातील आणि ग्रामीण भागातील गरजू मुलांना या कामात सामवून घेण्यासाठी सूचना देण्याची मागणी देखील करण्यात आली. याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी संगितले.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे,गजानन मांगळूरकर, रंगनाथ ठाकूर, रमेश पाटील, भास्कर पाटील, बाळाराम ठाकूर, दत्तात्रय वझे, ज्ञानेश्वर माळी वास्तुविशारद राजीव तायशेटे, अनंता पाटील, जितेंद्र ठाकूर, जनार्दन महाराज, गणेश महाराज, शरद पाटील तसेच भानुदास पाटील, समर वझे, किशोर पाटील, शिरीष माळी, दत्ता चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


