जागतिक पर्यावरण दिन २०२५" च्या पूर्वतयारीची नियोजन बैठक संपन्न
केडीएमसी क्षेत्रात फक्त वृक्षारोपणच नाही, तर पर्यावरणाचा उत्सव साजरा होणार"*
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : जागतिक पर्यावरण दिन २०२५ च्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॅा. प्रशांत पाटील, विविध खाजगी शाळांचे प्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन ही थीम जाहीर केलेली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी २२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत देशभरात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे फक्त प्रतीकात्मक झाडे लावणे किंवा प्लास्टिक निर्मूलन याव्यतिरिक्त क्षेत्रनिहाय, नागरिकांच्या सहभागाने वेळापत्रकाची आखणी करून दस्तऐवजीकरणासह एक संपूर्ण मोहीम राबवावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिले. झाडे लावण्याचे क्षेत्रनिहाय नियोजन करून त्याची तारीखनिहाय अंमलबजावणी करावी आणि यात नागरिकांच्या सक्रिय सहभागवर भर देण्यात यावा असे ते पुढे म्हणाले.ही मोहीम वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने राबविण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक महिन्यात, त्या-त्या महिन्याच्या संकल्पनेस अनुरूप उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक यांना आमंत्रित करून, हे उपक्रम शाळांमध्येही राबवावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरणीय जाणीव निर्माण होईल असेही ते पुढे म्हणाले.
शैक्षणिक व पर्यावरणीय दोन्ही दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल असे "Seed Bank" प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी लावण्याची संकल्पना देखील या बैठकीत उपस्थितांतर्फे मांडण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे पर्यावरण दिन साजरा करताना केवळ प्रतिकात्मकता न ठेवता, जास्तीत जास्त नागरिकांच्या ही मोहीम राबविण्याचा संकल्प करावा असेही निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिले.यावेळी महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि उपायुक्त अतुल पाटील यांनी सर्व सहभागी सदस्यांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


