पहलगाम अतिरेकी हल्ल्यात तिघा डोंबिवलीकरांचा मृत्यू भागशाळा मैदानात शहीद स्मारक उभारण्याची
आमदार, रविंद्र चव्हाण यांची मागणी,,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात तिघा डोंबिवलीकरांचा मृत्यू
केडीएमसी आयुक्तांना पत्र पाठवत निधी उपलब्ध असल्याचीही दिली माहिती
कल्याण : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तिघांच्या आठवणीसाठी डोंबिवलीमध्ये स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून या शहीद स्मारकासाठी आपल्याकडे निधीही उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. यामधील तिघे जण डोंबिवलीतील होते. एकाच कुटुंबाशी निगडीत असलेल्या या तिघांची दहशतवाद्यांनी अमानुषपणे गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे. मात्र, या दुःखद प्रसंगाला ही तीनही कुटुंबे अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले असून या घृणास्पद आणि अमानवी घटनेविरोधात डोंबिवलीकर नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.
या घटनेत प्राण गमावलेल्या परिवाराशी प्रत्येक डोंबिवलीकर नागरिकाचे भावनिक बंध जुळले आहेत. देशासाठी या तीन डोंबिवलीकरांनी बलिदान दिल्याची लोकभावना व्यक्त झाली. आणि त्यातूनच मग भागशाळा मैदानात या तिघांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो डोंबिवलीकरांनी गर्दी केल्याचे रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच या लोकभावनेचा विचार करता हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने या डोंबिवलीकरांची स्मृती भागशाळा मैदान येथे जपावी म्हणून स्मृतिस्थळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उभारावे ही समस्त डोंबिवलीकरांच्या वतीने मागणी असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. तर याबाबत प्रशासकीय मंजुरी तात्काळ देऊन कार्यवाही करावी, या कामाकरिता रु. १.२५ कोटी इतका भागशाळा मैदान सुधारणा निधी माझ्याकडे उपलब्ध असून त्याचा या स्मृतिस्थळासाठी विनियोग करता येईल असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर स्मृतिस्थळ उभारण्याविषयी तात्काळ कार्यवाही करून कै. हेमंत जोशी, कै. संजय लेले, कै. अतुल मोने या डोंबिवलीकरांच्या बलिदानाचा यथोचित गौरव व्हावा अशी भावना रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.



