महापारेषण कंपनीच्या जबरदस्ती व मनमानी कारभारा विरोधात सर्व पक्षीय आंदोलन
शेतकऱ्यांना प्रथम मोबदला द्या मग काम करा शेतकरी व आंदोलकांची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडवली, चिंचवली, उतणे, रुंदे, म्हस्कल, गोवेली, वाहोली, वसत, शेलवली यांसह १३ गावातून महापारेषण कंपनीच्या विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम करत असताना कंपनी कडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुचना, नोटीस व मोबदला न देता मनमानी व जबरदस्तीने महापारेषण कडून काम केलं जातं असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, या संदर्भात शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यानी पाठिंबा दर्शविला असून विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते वाहोली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, आधी शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्या मगच काम करा अशा प्रकारचा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी दिला आहे.
यावेळी तालुक्यातील शेकडो बाधीत शेतकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच पत्र देण्यात आलं. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता.


