वडोलगाव पुला समोरील रस्तासाठी केलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता, प्रत्यक्ष कामाला सुरुवात
कलम भूमी ,उल्हास नगर,प्रतिनिधी,उल्हासनगर, दि. ३० प्रतिनिधी : वडोलगाव पुला समोरील रस्त्याच्या दुर्देशे विरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली असून, उल्हासनगर महानगरपालिकेने मागण्या मान्य करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दोन वर्षे रस्त्याचा त्रास सहन केला आहे . रस्ता लवकरात लवकर तयार करावा म्हणुन पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सौ. सविता तोरणे, शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. तेव्हा या उपोषणाची महापालिका आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांनी दखल घेत सदर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उपोषणाची यशस्वी सांगता झाली आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत असलेल्या वडोल गांवच्या पुला समोरील रस्त्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षापासुन रखडले होते. ठेकेदाराने तो रस्ता अर्धवट स्थितीत सोडुन देवुन त्या रस्त्याचे काम पुर्ण झाल्याचे दाखवत ठेकेदार केशव याने महापालिके कडुन एक कोटी रुपये लाटले आहेत. अखेर त्या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे म्हणुन आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला. तेव्हा महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देत आज सकाळी प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे. तर शाळा सुरू होण्यापूर्वी इतर मूलभूत सोयी निर्माण करण्याचे आश्वासन ही देण्यात आले आहे. रस्ता मोठा असावा यावर आजही आम्ही सर्व वडोलगाव चे ग्रामस्थ यांच्याबरोबर ठाम आहोत , परंतु तात्पुरता तरी रस्ता येण्या जाण्यासाठी असावा अशी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची देखील मागणी आहे ती पूर्ण झाली असून आज कामाला सुरुवात झाली असल्याची माहीती शिवाजी रगडे यांनी दिली आहे. या उपोषणाला अन्याय विरोधी संघर्ष सनितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर , प्रहार जनशक्ती संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड . स्वप्निल पाटील , कल्याण राष्ट्र पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि कायद्याने वागा या संघटनेचे अध्यक्ष राज असंरोडकर सह इतर पक्षानी पाठींबा दिला होता . दरम्यान ओमी कलानी यांच्या मध्यस्थीने या उपोषणाची सांगता झाली आहे.
