टिटवाळा, बनेली येथील के बी के शाळेची भिंत कोसळून दुर्दैवी अपघात- महापालिका आपत्ती व्यवस्थापनाने घेतला घटनेचा आढावा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
आज दुपारी टिटवाळा परिसरातील बनेली येथील के बी के शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडून आली .यामध्ये कु. अंशकुमार महेंद्र सिंग, इ.५ वी या मुलाचा दुर्दैव मृत्यू घडून आला. कु.अभिषेक सहानी, इ.२ री या मुलास कल्याण मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि कु. राजेश गुप्ता, इ.३ री या मुलास फ्रॅक्चर असल्याने आणि शस्त्रक्रियेची गरज असल्याने सायन रुग्णालय मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन- संजय जाधव आणि अ प्रभागातील सहा. आयुक्त प्रमोद पाटील यांनीव त्यांच्या आपत्कालीन पथकाने तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन एकंदर परिस्थितीचा तात्काळ आढावा घेतला .

शाळेची उर्वरित धोकादायक भिंत देखील उपअभियंता हरून इनामदार यांनी अग्निशमन विभाग आणि अ प्रभागाच्या पथकामार्फत तोडण्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत टिटवाळा पोलीस स्थानका मार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती अ प्रभागाचे सहा. आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.
सदर कारवाई चे वेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि अवधूत तावडे- उपायुक्त अनधिकृत बांधकाम नियंत्रण उपस्थित होते .
