अज्ञात चोरट्यांचा दिव्यांगाचे बिअर शॉप फोडून बियर बॉक्सवर डल्ला,
घटना सीसीटीव्हीत कैद
कलम भूमी,उल्हास नगर. प्रतिनिधी,
उल्हासनगर , दि . ३० प्रतिनिधी : अज्ञात चोरट्यांनी एका दिव्यांग व्यक्तीचे बिअर शॉप फोडून त्यातील बिअरचे बॉक्स लंपास केल्याची घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
दुकानदार मुकेश बजाज हे दिव्यांग असून त्यांचे कॅम्प नंबर ३ च्या पंजाबी कॉलनी रस्त्यावर बिपीन बिअर शॉपचे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.पण चोरी झाली नसल्याने किंवा बिअरचे बॉक्स सुरक्षित असल्याने बजाज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती .मात्र काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला.सुरुवातीला दुकानातील काही बिअर वर ताव मारल्यावर १३ बिअरचे बॉक्स रिक्षात भरून चोरटे पसार झाले.
ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी दुकानदार मुकेश बजाज यांच्या तक्रारी वरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
