कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचे ठेकेदारावर ताशेरे - तीव्र नाराजी ; कारवाईचा इशारा
कल्याण पूर्व ५ ड प्रभागात नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनावर आयुक्तांचा सज्जड दम
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सज्ज होत असताना, ५ ड प्रभागातील नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामाबाबत आयुक्त अभिनव गोयल यांनी ३ मे २५ रोजी कडक पावले उचलली. या बैठकीत मोठ्या, मध्यम आणि लहान नाल्याची स्वच्छता पाणी करताना कामाचा प्रचंड ढिसाळपणा आढळून आला. यावर महापालिका आयुक्तांनी थेट ताशेरे ओढत, संबंधित ठेकेदारावर"तीव्र नाराजी"व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, कामातील सतगती आणि हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. ठेकेदारास तात्काळ मनुष्यबळ वाढविण्याचे, यांत्रिक साधनाचा प्रभावी वापर करण्याचे आणि कामाच्या पद्धतीत त्वरित सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. रस्त्यावरील स्वच्छतेनंतर पडून राहणारा कचरा आणि त्याची नियोजनशून्यता यावरही आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कचरा तातडीने हटवण्याच्या सूचनाही दिल्या. या हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, जीएसटी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कामगार कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त गोयल यांनी दिला.
या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील,३ क प्रभाग क्षेत्र सहा. आयुक्त धनंजय थोरात,५ ड प्रभाग क्षेत्र सहा. आयुक्त उमेश यमगर मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि ठेकेदार आनंद पवार उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, संपूर्ण शहरात पावसाळ्यापूर्वी दर्जेदार आणि वेळेत नालेसफाई चे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. येत्या काळात इतर प्रभागाची ही पाहणी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

