कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काही एजन्सी निविदा प्रक्रियेत 20 टक्के हून अधिक बिलो दराने निविदा भरून काम घेतात. अशा एजन्सी, ठेकेदाराचा त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा आदि तपासणी अंती सत्कार करावा अशी मागणी भाजपा पदाधिकारी सुशील पायाळ यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केडीएमसी आयुक्त यांना सुशील पायाळ दिलेल्या पत्रात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेमध्ये अतिशय परोपकारी जनतेचे हित जपणारे व पालिका प्रशासनाचा आर्थिक दृष्ट्या फायदा करून देणारे ठेकेदार अतिशय कमी दराने निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन स्पर्धात्मक निविदा प्रकिया पार पडत आहे. साधरण 20 टक्के पेक्षा जास्त कमी दराने निविदा भरून काही एजन्सी कामे प्राप्त करीत आहेत. टक्केवारी भरून कामे मिळवतात व ती कामे पूर्ण करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देतात.
त्यामुळे आपणास या बाबीची माहिती असणे अपेक्षित असल्याने आपणास अवगत करून देण्यासाठी व तब्बल वीस टक्के कमी किंवा त्याहून अधिकची कमी टक्केवारी भरून कामे मिळवणाऱ्या ठेकेदारांचा प्रशासक म्हणून आपल्या मार्फत जाहीर सत्कार करण्यासाठी सदरच्या ठेकेदारांनी केलेल्या कामाची गुणवत्ता नियम, अटी व शर्तीनुसार असल्याची खातरजमा करून तसेच जिल्हा दर सूचीनुसार प्राकलन दरापेक्षा यांना बिलो कामे कशी परवडतात हा देखील सवाल उभा ठाकला आहे. पदरचे पैसे टाकून अशा एजन्सी कौतुकास्पद काम करीत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
तरी अशा महान, परोपकारी आणि जनतेचे हित साधणाऱ्या एजन्सीचा, ठेकेदारांचा प्रशासनाच्या वतीने जाहीर सत्कार करावा. त्यामुळे प्रशासनाची बिलो टेंडर भरणाऱ्या एजन्सी व ठेकेदार यांनी केलेली कामे वादाच्या भोवर्यात सापडणार का असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

