उड्डाणपुलासाठी बाधित झालेल्या उद्यानाच्या संरक्षण भिंतीवर हातोडा
उद्यानाच्या जागेचा महापालिकेकडून ताबा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र हा उड्डाणपूल सुभाषचंद्र बोस चौकात उतरविण्याचे काम डॉ आंबेडकर उद्यान आणि त्यापुढे असलेल्या रेल्वे कॉलनीच्या जागेमुळे रखडले होते. उद्यानाच्या जागेवर सकारत्मक तोडगा काढल्यानंतर आज या उद्यानाच्या संरक्षण भिंतीसह आवश्यक जागेवरील बांधकामावर हातोडा मारत पालिका प्रशासनाने कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या नेतृत्वाखाली हि जागा ताब्यात घेतली. यावेळी १५० पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनकडून सुभाषचंद्र बोस चौकापर्यत उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी उद्यानाचा अडथळा येत असल्याने उद्यानाची जागा मिळावी यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु होता मात्र उद्यान बचाव समितीने जागा देण्यास विरोध केला होता. प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाताच समितीचे सदस्य चक्क जेसीबी मशीनसमोर झोपून आंदोलन छेडले गेले होते.
तेव्हापासून समिती सदस्यांनी साखळी आंदोलन सुरु ठेवल्याने काम रखडले होते. अखेर पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यस्थीने या समिती सदस्यांशी बैठक घेत उद्यानासाठी मागील बाजूची जागा देत रस्त्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव समितीने मान्य केल्याने तिढा सुटला होता आज पालिकेच्या अधिकारी लोकरे यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात उद्यानाची संरक्षण भिंत तोडून फुटपाथवरील झाडे हटवून हि जागा ताब्यात घेत त्याला पत्र्याचे कुंपण घालून बंदिस्त करण्यात आले. उद्यापासून उड्डाण पुलाचे काम सुरु केले जाणार असून रेल्वेच्या जागेवर देखील काम लवकरच सुरु केले जाणार असल्याने उड्डाणपूल मार्गी लागण्याची आशा वाढली आहे.



