नागरी वस्तीतील गॅस सिलेंडर गोडाऊनची मान्यता रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण व उल्हासनगर शहरात शेकडो लोकांचे जीव धोक्यात घालून नागरी वस्ती मध्ये गॅस सिलेंडर गोडाऊन चालविणारे गॅस एजन्सीची मान्यता रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण आणि उल्हासनगर शहरातील काही गॅस एजन्सी व्यापाऱ्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी शेकडो नागरिकांच्या जीवाला धोक्यात घालून आपले गॅस एजन्सीचे गोडाऊन रहिवासी वस्तीत थाटले आहेत. मुळात गॅस एजन्सी मालकाला गॅस गोडाऊन रहिवासी वस्ती पासून लांब ठेवण्याच्या अटी व शर्तीवर गॅस परवाना दिला जातो, परंतु पळवाट म्हणून नियमाचे पालन करण्यासाठी एक गोडाऊन शहराच्या बाहेर ठेवले जाते व दुसरे वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी तसेच ग्राहकांना जवळून सिलेंडर सप्लाय करण्यासाठी गोडाऊन शहराच्या रहिवासी वस्ती मध्ये ठेवले जाते.

असाच एक प्रकार समोर आला आहे की कल्याण शहरातील हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस एजन्सी मालकाने त्यांचे अधिकृत गॅस गोडाऊन मोहने टिटवाळा परिसरात असल्याकारणाने त्यांना ट्रान्सपोर्टेशन महाग पडत असल्यामुळे त्यांनी सिलेंडर सप्लाय साठी एक अनधिकृत गोडाऊन रहिवासी वस्तीत कल्याण पश्चिम येतील डीबी चौक परिसरात कार्यरत ठेवले आहे. तसेच उल्हासनगर येथील हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस एजन्सी मालकाने आपले सिलेंडर सप्लाय साठी गोडाऊन शान्तीनगर, उल्हासनगर ३, मध्ये भर रहिवासी वस्तीत थाटले आहे. जे कायद्याने मोठा गुन्हा असून या रहिवासी परिसरात जर कदाचित सिलेंडर स्फोट झाला तर या स्वार्थी गॅस एजन्सी मालकांमुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या विषयांची सखोल चौकशी करून गॅस एजन्सी मालकावर कठोर कारवाई करून गुन्हा नोंदवून गॅस एजन्सीचे परवाना रद्द करण्याची मागणी साळवे यांनी केली आहे.