कल्याणमधील टाटा कौशल्यवर्धन केंद्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने केंद्राची उभारणी
कल्याण डोंबिवली व ठाणे शहरातील विद्यार्थी तसेच सुक्षम, लघू आणि मध्यम उद्योगांना होणार फायदा
केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण शहरातील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने सुमारे १९७ कोटी रुपयांच्या निधीतून हे केंद्र उभे राहणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज, इतर उद्योग संघ, एमआयडीसी व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. यामाध्यमातून दरवर्षी अंदाजे ७००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी ४.३० वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे टाटा सारख्या अनेक कंपन्या मतदारसंघात याव्यात आणि येथील भूमिपुत्रांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नेहमीच
प्रयत्नशील असतात. याच पार्श्वभूमीवर टाटा समवेत कल्याण येथील दावडी येथे कौशल्यवर्धन केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी टाटा संस्थेसमवेत करार देखील करण्यात आला आहे. या केंद्रासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत १ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर २१ हज़ार ५०० स्क्वेअर फुट या जागेवर केंद्राचे बांधकाम केले जाणार असून सुमारे या प्रकल्पासाठी एकूण खर्च १९७ कोटी इतका होणार आहे. तर येत्या सहा ते सात महिन्यात या केंद्राच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जाणार आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना, उद्योग व्यावसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकता निर्माण करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधारणा करणे. तर कुशल मनुष्यवळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी या सेंटरच्या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण देणे. या ठिकाणी उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांना या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार. या जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढविण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. नवोदित उद्योजकांना नवीन उत्पादन विकसित करण्यास मदत या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, साधने आणि उपकरण यांची सेंटर मार्फत स्थापना करण्यात येणार आहे.


