जीवनदिप महाविद्यालय गोवेलीचा 21 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे जीवनदीप शैक्षणिक संस्थेचा 21 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कित्येक वर्षांपूर्वी रवींद्र घोडविंदे यांनी लावलेल्या एका रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. जीवनदीप शैक्षणिक संस्थेची 21 वर्षाची समृद्ध शैक्षणिक वाटचाल पूर्ण होत आहे. याप्रसंगी दरवर्षी प्रमाणे 20 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणगौरव करण्यात आला.
यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून हिंदू युवा सेना संघाचे डॉ. विवेक मोडक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले. डॉ.मोडक यांनी योग दिनाच्या दिवशी होत असलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात प्रामुख्याने योगाचे महत्व सांगत जीवनदीप संस्थेचा आजपर्यंतचा झालेला प्रवास सांगितला. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी संस्थेचा झालेला प्रवास सांगत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.
यावेळेस समाजामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांपैकी अनेकांना गौरविण्यात त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात साहसी कामगिरी केलेले अजित कारभारी, सामाजिक कार्य करणारे आदेश चौधरी, सोमनाथ राऊत, पर्यावरण वन्यजीव रक्षक प्रवीण भालेराव, शैक्षणिक पेटंट प्राप्त प्रा.राजाराम कापडी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयकुमार रिजवानी, आधार अपंग संघटनेचे भगवान सुरोशे, गंधर्व गुरुकुल संस्था टिटवाळा च्या वैदही नादगायकर यांचा सहभाग होता.
अनेक उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती प्रोत्साहित करत समाजामध्ये बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.सतीश लकडे व प्रा. नरेश टेंभे यांनी केले.



