पूर्वेत इमारतीची संरक्षक भिंत कोसळून अनेक गाड्यांचे नुकसान
बांधकाम साहित्याच्या दबावामुळे पडली भिंत
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : निर्माणधीन असलेल्या इमारतीच्या बांधकाम साहित्याच्या दबावामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून अनेक टू व्हीलर आणि काही चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण पूर्वेच्या काटे मानिवली परिसरात हा प्रकार घडला आहे. तर यासंदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सोसायटीकडून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली परिसरात योगेश्वर टॉवर नावाची सोसायटी आहे. या सोसायटीला लागूनच गेल्या काही महिन्यांपासून नव्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी सतत रेती, खडी आदी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात उतरवले जात आहे. मात्र त्याच्याकडून अद्याप याठिकाणी कोणतीही भिंत बांधण्यात आली नसल्याने हे बांधकाम साहित्य शेजारील योगेश्वर टॉवरच्या संरक्षक भिंतीला लागून टाकले जात असल्याची माहिती सोसायटीकडून देण्यात आली
तसेच या बांधकाम साहित्यामुळे संरक्षक भिंतीवर मोठा दबाव देऊन भिंतीला धोका निर्माण होऊन एखादी दुर्घटना घडू शकते. अशी भिती सोसायटीने व्यक्त करत त्यासंदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे आजच्या या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले.
दरम्यान सोमवारी रात्री योगेश्वर सोसायटीची ही भलीमोठी भिंत कोसळली यामुळे अनेक टू व्हीलर आणि काही चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या बांधकाम व्यावसायिकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून झालेल्या नुकसानाची भरपाई लवकर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.


