कल्याण तहसील कार्यालयातील उघडी विद्युत डीपी जीवघेणी ठरण्याची शक्यता
प्रशासनाचा उदासीन कारभार उघड
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण तहसील कार्यालय परिसरात नागरिकांची ये जा नेहमीच सुरू असते. शेकडो महिला, वृद्ध, दिव्यांग बांधव आणि विविध शासकीय कामांसाठी येणारे सामान्य नागरिक येथे दिवसभर गर्दी करतात. मात्र, या ठिकाणी असलेली उघडी आणि जीर्ण अवस्थेतील इलेक्ट्रिक पॅनल बॉक्स नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाण्यातून वीज प्रवाहित होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत उघड्या तारांमुळे कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात घडू शकतो. यामुळे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. मुख्य प्रवेश द्वाराशेजारीच ही उघडी डीपी आहे सध्या शाळा कॉलेजच्या प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यासाठी अनेक विद्यार्थी तसेच लहान बालकांसह महिला देखील येथे येत असतात. तर आपल्या विविध मागण्यासाठी विविध संघटना, पक्ष यांचे मोर्चे देखील येथे येत असतात.
कार्यालयात येणाऱ्या महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना या धोकादायक स्थितीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. मुख्य म्हणजे रोज खुद्द तहसीलदार देखील याच प्रवेश द्वाराने आपल्या कार्यालयात येत असतात. मात्र तरीदेखील या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तहसील कार्यालय प्रशासनाने या उघड्या इलेक्ट्रिक पॅनल बॉक्सला त्वरित झाकण लावून दुरुस्त करावे, तसेच परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षीत करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. अन्यथा एखादा अपघात घडल्यास त्यास प्रशासनच जबाबदार राहील, असा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

