महापालिका अति.आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केली१/अ प्रभागातील साफसफाईची समक्ष पाहणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
पावसाळी परिस्थितीत उद्भवणा-या साथरोग निर्मुलनाबाबत केल्या जाणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेचे अति.आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज सकाळी ८ वाजल्यापासून १/अ प्रभागातील अधिकारी कर्मचा-यांची जंतुनाशक फवारणी, कचरा संकलन, साफसफाई याबाबत आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये, प्रभागनिहाय दिलेल्या कृती आराखडा प्रमाणे कामे सुरु आहेत अथवा नाही याची खातरजमा करण्यासाठी स्वत: वडवली,अटाळी, आंबिवली येथील परिसरात प्रत्यक्ष फिरुन पाहणी केली.
यावेळी त्यांनी नागरिकांना पाण्याचा साठा जास्त दिवस न करणेबाबत तसेच आठवडयातून १ दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत सुचना दिल्या,तसेच सदर परिसरात घराबाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रमची स्वत: तपासणी करुन सदर ड्रम रिकामे करवून जंतुनाशक फवारणी करुन घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी स्वत: संशयित डेंग्यु रुग्ण असलेल्या घराची व आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.सदर परिसरातील सोसायटयांच्या आवारात पावसाचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेणेबाबत तसेच सदर सोसायटयांमधील घराघरात असलेल्या कुंडया,मनीप्लान्ट व तत्सम ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासआळी निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी असे आवाहनही अति.आयुक्त हर्षल गायकवाड यांनी यावेळी केले.
या पाहणी दौ-याच्यावेळी १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक उपस्थित होते.


