सभापती, उपसभापती, संचालकांच्या मागे किसन कथोरे
भाजप आमदार किसन कथोरे यांचा सूचक इशारा
निवडणूक झाल्याने प्रशासकाचा काही संबंध नाही
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : एकदा निवडणूक झाल्यावर प्रशासकाचा काही संबंध राहत नाही. आपोआपच अधिकार हे बाजार समितीच्या संचालकांकडे येतात. त्यामुळे प्रशासकाचा दाद देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रशासक दाद देत नसेल तर सभापती, उपसभापती, संचालक यांच्या मागे किसन कथोरे आहे अशा शब्दात भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी बाजार समितीच्या प्रशासकाला सूचक इशारा दिला आहे.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यावर बाजार समितीचे संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहेत. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेल्याचा आरोप करीत या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संचालक मंडळ राजीनामा देणार असल्याचा इशारा संचालकांनी दिला होता. तसेच प्रशासकाच्या मनमानी विरोधात बंदचे हत्यार उपसण्यात येईल असाही इसारा देण्यात आला होता. त्या पश्चात सोमवारी भाजप आमदार कथोरे यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.
दरम्यान बाजार समितीच्या आवारात रस्ते आणि भूयारी गटारींची समस्या आहे. तसेच काही विकास कामांचे प्लान आहेत. या सगळ्या विकास कामांचा संयुक्त विकास आराखडा तयार करुन ती कामे मार्गी लावण्यासाठी आमदार कथोरे यांनी कल्याण डोंबिवलीचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील, संचालक भाऊ गोंधळे आदी उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे ही यापूर्वी आमदार कथोरे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या विधानसभा मतदार संघाशी जोडली गेली होती. त्या वेळेपासून त्यांना या भागातील समस्या माहिती आहे. त्यामुळे त्यांनी २७ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात याव्यात. २७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने मार्गी लावावे. तसेच रिंग रोड प्रकल्पातील अडथळे दूर करुन बाधितांचे पुनर्वसन करावे. याशिवाय कल्याण तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाची इमारत नव्याने तयार करुन त्याठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. या विविध विषयावर आयुक्त गोयल यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

