चिमुकल्यांनी रोपलावणी करत निसर्गाशी जोडलं घट्ट नातं
आर. बी. कारिया प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माती दिन साजरा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : आर. बी. कारिया इंग्लिश प्री-स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माती दिन अत्यंत उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील चिमुकल्यांनी मातीशी स्नेह जपत छोट्या रोपांची लागवड केली. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता वाढवणे हा होता.
या विशेष उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका दीपाली राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली आणि रोपलावणी करताना मार्गदर्शनही केले. शाळेतील ऊर्जावान शिक्षकवृंद आणि कार्यतत्पर मदतनीस कर्मचारी यांनी मुलांना रोपं लावताना मदत केली, तसेच त्यांच्यातील कौतुक वाढवले.
बालवर्गातील मुलांनी आपल्या छोट्या छोट्या हातांनी माती उकरून, त्यात रोपं लावत आनंद व्यक्त केला. मातीशी थेट संपर्क, त्याचा सुगंध, स्पर्श यामुळे मुलांचे नैसर्गिक जगाशी नाते अधिक दृढ झाले. या क्रियेतून त्यांनी रोपांचे महत्त्व, त्यांची काळजी कशी घ्यायची हे शिकले. मुख्याध्यापिका राजपूत यांनी सांगितले की, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निसर्गाशी जोडलेले उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा कृतीतून त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण होते.” शाळेतील माती दिन हा फक्त आनंदाचा क्षण नव्हता, तर निसर्गाबद्दल प्रेम व काळजी शिकवणारा एक जीवनमूल्यांचा अनुभव होता.


