आंबिवलीत जुन्या जलकुंभाच्या जागी नवीन जलकुंभ बांधण्याची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभाग हद्दीतील आंबिवली स्टेशन परिसरात असलेल्या जुन्या जलकुंभाच्या जागी नवीन जास्त क्षमतेचा जलकुंभ बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील व आरपीआय सोशल मीडिया आयटी सेलचे भिवंडी लोकसभा प्रमुख दीपक सकपाळ यांनी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अटाळी आंबिवली येथे शंकर भोईर कंपाऊंड याठिकाणी जुनी पाण्याची टाकी आहे. या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल त्या दृष्टिकोनातून आहे ती टाकी तोडून त्या ठिकाणी उपलब्ध जागेत पुन्हा नवीन जास्त दशलक्ष लीटर क्षमेतीची पाण्याची टाकी बांधल्यास येथील पाणी प्रश्न निर्माण होणार नाही. पूर्वी संपूर्ण अटाळी गाव आंबिवली स्टेशन परिसराला हे पाणी मिळत होते परंतु मागील 10 वर्षात येथील लोकविस्तार व लोकसंख्या यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतं जाणार असून नवीन जास्त क्षमेतचा जलकुंभ बांधण्यात आला तर त्यामुळे गणेश नगर, पाटील नगर, भोईर कंपाऊंड, मोतीराम नगर, आंबिवली स्टेशन, शिवाजी नगर, कामगार नगर, मंगल नगर, संतोषी माता नगर, आंबिवली गाव, नेपच्यून, नवनाथ कॉलनी, धर्मवीर अमर दीप जानकी संत ज्ञानेश्वर नगर, हरिदर्शन हरिश्चंद्र नगर, खापरी पाडा जानकी नगर, विराट बिल्डिंग अटाळी गाव व वाढत्या इमारती येथे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. त्यामुळे याठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

