नाल्याच्या प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाने केली सुटका
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभागक्षेत्रातील विठ्ठलवाडी नजीकच्या खडेगोळवली मुख्य नाल्यात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या प्रवाहातून सुखरुप बाहेर काढल्याची घटना गुरुवारी घडली.
प्रवीण पवार नावाची व्यक्ती महालक्ष्मी शॉपिंग सेंटरजवळील मोठ्या नाल्याजवळ बाटल्या वेचण्यासाठी गेली असता, मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत तोल जाऊन नाल्यात पडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ कारवाई करीत वेगाने वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहातून मोठ्या दमछाकी अंती अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित व्यक्तीस सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने त्या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून ती व्यक्ती सध्या स्थिर व सुरक्षित असल्याचे ड प्रभाग सहाय्यक आयुक्त उमेश यमगार यांनी सांगितले. तरी नागरिकांनी अशा ठिकाणी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असे सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

