पेंढारकर बचाव मोहिमेला ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पाठबळ
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी पेंढारकर महाविद्यालय संघर्षामध्ये आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एन्ट्री केली आहे. न्यायालयात गोरगरीब विद्यार्थी व अत्याचार पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बाजू मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सदावर्ते यांनी वकीलपत्र दाखल केले आहे. पेंढारकर कॉलेजच्या अनागोंदी कारभारा विरोधात सेव्ह पेंढारकर मोहीम राबवली जात आहे. अनुदानित असलेले पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्याविरोधात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कॉलेज वाचविण्यासाठी दोन्ही विभागात प्रशसक नेमण्यासाठी सेव्ह पेंढारकर मोहीम काम करत आहे. तर शासनाने कोर्टात योग्य बाजू न मांडल्याने ११वी, १२ वी आणि अनएडेड हे दोन विभाग कॉलेजच्या संस्था चालकांकडे दिले असून १३वी ते १५ वी या एडेड विभागावर प्रशासक नेमला आहे. २०१२ पासून सुरु असलेल्या अन्यायाविरोधात वर्षभरापासून सेव्ह पेंढारकर मोहीम आंदोलन सुरु आहे. शासनाने कणखरपणे बाजू न मांडता कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने सेव्ह पेंढारकर मोहिमेने कोर्टात धाव घेतली असून कोर्टात विद्यार्थी आणि शिक्षकांची बाजू परखडपणे मांडण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकीलपत्र घेतले असल्याची माहिती सेव्ह पेंढारकर मोहिमेचे रोहिदास सुरवसे यांनी दिली.
