कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; महसुलात वाढ
९१ पावत्यांद्वारे १.७३ लाखांचा कर संकलन, ५ हस्तांतरण प्रकरणांचा तात्काळ निपटारा
कल्याण भूमी ,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण (पूर्व) येथील रचना पार्क परिसरात आयोजित मालमत्ता कर व पाणी बिल भरणा शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर न्यू रचना ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात एकूण ९१ कर पावत्यांद्वारे रु. १,७३,६३५/- इतकी रक्कम थेट जमा झाली, तर ऑनलाईन माध्यमातून रु. ९१,०००/- ची भर पडली. त्यामुळे महापालिकेच्या महसूल संकलनात लक्षणीय वाढ झाली असून, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, या शिबिरात पाच मालमत्ता हस्तांतरण प्रकरणांचे तात्काळ निपटारा करण्यात आला. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या शिबिरामध्ये करदात्यांसाठी कर भरणा, दस्तऐवज पडताळणी, हस्तांतरण प्रक्रिया यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे एक खिडकी प्रणालीचा अनुभव देणारे हे शिबिर नागरिकांसाठी सोयीचे ठरले.
महापालिकेच्या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत भविष्यातही अशाच प्रकारचे शिबिरे नियमित आयोजित करावीत, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.

