कल्याणमधील वाहतूक कोंडीवाढता प्रवासी ताण आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक वरुण पाटील यांनी दुर्गाडी ते बिर्ला कॉलेज रोड दरम्यानच्या रिंग रूट परिवहन बससेवेच्या फेऱ्या वाढवण्याची ठाम मागणी केली आहे. यासाठी त्यांनी केडीएमसी आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांना पत्र सादर केले आहे.
सध्या या मार्गावरील बस फेऱ्या अत्यंत मर्यादित आणि अनियमित असल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार, वयोवृद्ध तसेच स्थानिक नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. वेळेवर बस न मिळाल्याने अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे प्रवास खर्चिक होतो आणि रस्त्यावर वाहतूक कोंडीही वाढते.
भाजपाने ही मागणी केवळ वाहतूक सुलभतेसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी केल्याचा दावा केला आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने नागरिकांच्या समस्यांवर ‘प्रत्यक्ष कृती’चा संदेश दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर परिवहन सुधारणा हा विषय नेहमीच चर्चेत असतो, आणि सत्ताधाऱ्यांवर नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न करण्याबाबत टीका होते.
या मागणीला प्रतिसाद देताना महापालिकेने ठोस पावले उचलली, तर केवळ प्रवासी ताण कमी होणार नाही, तर कल्याणच्या अंतर्गत वाहतुकीच्या नियोजनातही सुधारणा होईल. मात्र, या मागणीवर प्रशासन किती लवकर निर्णय घेते आणि तो अंमलात आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

