२७ गावातील कर्मचाऱ्यांच्या केडीएमसीत समावेशाला वेग – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत २७ गावांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासंबंधीची महत्वाची बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसह स्मारक उभारणी, पाणी करासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात २७ गावांतील ग्रामपंचायतीमधील ४९९ कर्मचाऱ्यांचा केडीएमसीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाने यास मान्यता देत या कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीच्या पदावरच महापालिकेत कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यापैकी १८० कर्मचाऱ्यांना नवरात्रीत नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
बैठकीत पुढील मागण्यांवर चर्चा झाली –
- निरक्षर कर्मचाऱ्यांना मेडिकल व पोलीस व्हेरिफिकेशन देणे.
- मृत व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी व पेन्शन लागू करणे.
- कमी शिक्षण असलेल्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक निकष पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांची मुदत देणे.
तसेच कचोरे टेकडी येथील संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध असून लवकरच उभारणी सुरू होणार असल्याचे सूचित करण्यात आले.
२७ गावातील नागरिकांना आकारल्या जाणाऱ्या पाणी कराच्या प्रश्नावरही चर्चा झाली असून लवकरच याबाबत आढावा बैठक घेऊन तो मार्गी लावला जाईल असे खासदारांनी स्पष्ट केले.
बैठकीला आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पालिका अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


