कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पश्चिमेतील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात नाट्यरसिकांच्या जीवाशी खेळ करत मुदत संपलेले कोल्ड्रिंक विक्रीला ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर जोरदार टीका होत आहे.
गुरुवारी एका गुजराथी नाटकाच्या मध्यंतरावेळी रसिकांनी कँटीनमध्ये कोल्ड्रिंक मागितले असता त्यांना थेट एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्या देण्यात आल्या. इतकेच नव्हे तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या इतर बाटल्याही कालबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या आरोग्याशी असा घोर खेळ होत असताना केडीएमसी प्रशासन झोपलेलेच का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिर हे कायम वादग्रस्त ठरत असून आता या प्रकरणामुळे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करावी, अशी मागणी नाट्यप्रेमींनी केली आहे.
महापालिकेने पाच वर्षांसाठी ठेका देताना अटी-शर्ती घालून दिलेल्या असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे हा प्रकार हा फक्त ठेकेदाराचा नाही तर महापालिकेच्या ढिलाईचा देखील परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित ठेकेदारासह महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही केली नाही तर नागरिकांचा आक्रोश आणखी तीव्र होईल, असा इशारा नाट्यरसिकांनी दिला आहे.


