.कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा – भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या जीवाला धोका!
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सतत वाढणाऱ्या हल्ल्यांमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य लोक भयभीत झाले आहेत. परंतु महापालिका प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री उपाययोजना जाहीर करण्यातच मश्गूल आहे.
प्रशासनाकडून "स्वान निर्बीजिकरण शस्त्रक्रिया व लसीकरण" केंद्र सुरु करण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने राबवली जात आहे. महिन्याला फक्त 2000 ते 2500 निर्बीजिकरण शस्त्रक्रिया करण्याची क्षमता दाखवली जात असली तरी रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. परिणामी नागरिकांना रोज भयभीत वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकांना वेळोवेळी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून "स्वानदंश प्रवर्गीकृत उपचार" (Anti Rabies Vaccine) व इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
महापालिकेकडून वेळोवेळी मोठमोठ्या योजना जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा संतप्त नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरतील असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
