डोबिवलीत राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; सुनीलनगर हादरले – पीडितेची न्यायाची मागणी,
कलमभूमी,कल्याण प्रतिनिधी,
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर परिसरात शनिवारी रात्री स्थानिक बांधकाम व्यावसायिकाला मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणात राजकीय पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश मोरेश्वर शिंदे (वय ५४, व्यवसाय – बांधकाम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरप्रमुख ओमनाथ नाटेकर, शाखाप्रमुख सचीन कोर्लेकर, गावकर यांचा मुलगा, राम चव्हाण आणि इतर काही जणांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीस मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी ते ठाणे येथे कामानिमित्त जात असताना सुनीलनगर नाका येथे काही परिचितांशी चर्चा झाली. संध्याकाळी दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडले असता आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. त्यावेळी ओमनाथ नाटेकर यांनी जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली आणि गावकर व त्यांच्या मुलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रसंगी त्यांच्या पत्नीला देखील धक्काबुक्की झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेवेळी १५ ते २५ जण उपस्थित असूनही कोणीही हस्तक्षेप केला नाही, असा दावा शिंदे यांनी केला आहे. “अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही भयभीत झालो. पोलिसांनी तात्काळ निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी पीडित शिंदे दाम्पत्याने केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तपास अधिकारी म्हणाले की, “सर्व बाजूंची माहिती घेऊन कायदेशीर चौकशी केली जाईल. कोणालाही कायद्यापेक्षा वरचढ वागता येणार नाही.”

