विठ्ठल भक्तीचा महासोहळा — कल्याण दुमदुमले हरिनामाच्या गजरात”
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
भागवत एकादशी निमित्ताने कल्याण येथील विठ्ठल मंदिरात भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण अनुभवायला मिळाले. सकाळी पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिरात काकड आरती, अभिषेक, हरिनामाचा जयघोष आणि कीर्तनाचा आनंदी सोहळा सुरु झाला. ब्रह्ममुहूर्तापासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
मंदिराचे विश्वस्त यांच्या हस्ते भागवत एकादशीचा अभिषेक पार पडला. भक्तांनी मनोभावे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत, आरतीत सहभागी होत आपले जीवन धन्य केले. वातावरणात “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” असा गजर घुमत होता.
भागवत एकादशीचे अत्यंत धार्मिक महत्त्व असून, पंढरपूर येथे आज लाखो वारकरी विठ्ठल चरणी उपस्थित राहणार आहेत. त्या भक्तीमय वातावरणाचा अनुभव कल्याणकरांनीही घेतला.
विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या महिला भक्तांनी प्रभात फेरी काढत शंकरराव चौक ते शिवाजी महाराज चौक असा हरिनामाचा जयघोष केला. तालावर नाचणाऱ्या भक्तांच्या आनंदी मुखमुद्रा पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले.
हा सोहळा भजनी मंडळाच्या संचालिका कुंदा उगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. आजच्या भागवत एकादशीसह चातुर्मासाची समाप्ती झाली असून, भक्ती आणि श्रद्धेच्या त्या भावस्पर्शी क्षणांनी कल्याण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.



