ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंचा गौरव : राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात दुमदुमला,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
"वाचा, शिका आणि संघर्ष करा" या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक मंत्राचा उजाळा देत शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजक व ब्लॅक अँड व्हाईट साप्ताहिकाचे संपादक विजय यादव यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाला प्रेरणादायी संदेश दिला. समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा सोहळा डोंबिवलीतील वक्रतुंड हॉल येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
राज्यभरातून आलेल्या नामांकित ४० गुणी शिक्षकांना “शिक्षक रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. ब्लॅक अँड व्हाईट सप्ताहिक आणि इंडियन टीव्ही न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय सोहळा दिमाखात झाला.
मनोगत व्यक्त करताना विजय यादव म्हणाले,
“आज मी जे काही आहे, ते माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळेच. शिक्षक हेच आपल्या जीवनातील खरे शिल्पकार.”
त्यांच्या या भावनिक वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात कल्याण, डोंबिवली, मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद या विविध शहरांतून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. स्नेह, उत्साह आणि एकात्मता निर्माण करणारा हा सोहळा शिक्षकांच्या अनुभवांनी आणखी रंगला.
मानकरी सतीश सर यांनी शिक्षकांवरील कामाचा वाढता ताण व सरकारी उदासीनतेवर भाष्य करताना सांगितले,
“शैक्षणिक नसलेली अनेक कामे शिक्षकांवर लादली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वेळ कमी पडतो. सरकारने शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.”
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सारिका मॅडम यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत लहानपणीच्या शालेय शिस्त, गृहपाठ न केल्यास मिळणाऱ्या शिक्षेच्या गमतीशीर आठवणी सांगितल्या. शिक्षकांनीही आपापल्या शिक्षणप्रवासातील अनुभव, विद्यार्थ्यांमधील बदल, तसेच भारतीय व विदेशी शिक्षण पद्धतीतील फरकावर मोकळेपणाने चर्चा केली.
हसत-खेळत, आठवणींनी भारलेला, शिक्षकांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू नायकवाडे आणि किरण हिंदुस्थानी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

