लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्रालयावर वादळ — “अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मोदी सरकार पूर्णपणे अपयशी वल्ली राजन
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर केंद्र सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते वल्ली राजन यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत “देशाच्या सुरक्षेला हादरा देणाऱ्या या घटनेची पूर्ण नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे” असा आरोप केला.
वल्ली राजन यांनी संताप व्यक्त करत म्हटले—
“देशाची राजधानीच सुरक्षित नाही, मग देश सुरक्षित कसा म्हणता? या स्फोटातील निर्दोष नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी अमित शहा यांच्यावरच आहे. ते प्रत्येक सुरक्षा आघाडीवर अपयशी ठरले आहेत. त्यांचा राजीनामा ही आज भारतीयांची एकमुखी मागणी आहे.”
ते पुढे हल्लाबोल करत म्हणाले—
“मोदी सरकारने सुरक्षेपासून अर्थव्यवस्था, रोजगार, आणि कायदा-सुव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात घोर अपयश मिळवले आहे. आश्वासनांच्या पलीकडे काहीच दिले नाही. आज देश भयाच्या छायेत आहे आणि त्याला जबाबदार केंद्र सरकारच आहे.”
वल्ली राजन यांनी स्फोटाचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोपही केले—
“ही घटना सरकारच्या निष्क्रियतेची आणि ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची उघडीपणे खिल्ली उडवणारी आहे. गृहमंत्रालय झोपेत आहे का? भारतीयांचा जीव माणूस म्हणून मोलाचा नाही का?”
स्फोटानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले असून केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
