कल्याण-डोंबिवली महापालिका 2026 : भाजप–शिवसेना युतीचा दणदणीत विजय, महापौरपद युतीलाच
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीने मोठे यश संपादन केल्याने महापौरपद युतीकडे जाणार असल्याचा ठाम विश्वास भाजपचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीतील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन युतीचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीचे 110 पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नंदू परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, विरोधकांकडून ईव्हीएम यंत्रणेबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याच्या प्रश्नावर नंदू परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधक पराभूत झाले की अशाच प्रकारचे आरोप करत असतात. जनतेने लोकशाही मार्गाने आम्हाला कौल दिला आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
यावेळी नंदू परब यांनी कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे आभार मानत, “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी युती कटिबद्ध असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल,” असे आश्वासन दिले.
