कल्याणमध्ये रेल्वे बोर्डाचा बनावट व्हिजिलन्स इन्स्पेक्टर रंगेहाथ अटकेत
२० हजारांची लाच घेताना मध्य रेल्वे सतर्कता विभागाची मोठी कार्र्वाई,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
बुकिंग क्लर्कच्या तक्रारीनंतर ५ तासांची गुप्त कारवाई,
कल्याण,मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने रेल्वे बोर्डाचा व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याची तोतयागिरी करणाऱ्या एका भामट्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून मोठी कारवाई केली आहे. या धाडसी कारवाईमुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील बुकिंग कार्यालयात कार्यरत असलेले मंगेश बडगुजर यांनी सतर्कता विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आरोपी हरीश कांबळे हा स्वतःला रेल्वे बोर्डाचा व्हिजिलन्स इन्स्पेक्टर असल्याचे सांगून डीआरएम कार्यालयात प्रलंबित रकमेचा प्रश्न मार्गी लावून देण्याचे आमिष दाखवत बडगुजर यांच्याकडे ६० हजार रुपयांची लाच मागत होता. यापैकी ४० हजार रुपये फोन-पे द्वारे आधीच स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुरुवारी, २२ जानेवारी रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास, उर्वरित २० हजार रुपये घेण्यासाठी आरोपी पुन्हा कल्याण येथे आला. याची पूर्ण माहिती आधीच सतर्कता विभागाला देण्यात आल्याने, अधिकाऱ्यांनी सापळा रचत आरोपीवर नजर ठेवली होती. बुकिंग क्लर्ककडून पैसे स्वीकारताच सतर्कता विभागाच्या पथकाने कांबळेला रंगेहाथ पकडले.
धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या या बनावट व्हिजिलन्स इन्स्पेक्टरची ओळख मध्य रेल्वेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कांबळे हा रेल्वे बोर्डाचा अधिकारी असल्याची खोटी ओळख देत रेल्वे अधिकाऱ्यांकडून इमरजन्सी व व्हीआयपी कोट्याचे तिकीट काढून देण्याचे प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, २०१२ साली सीएसटी लोहमार्ग पोलिसांनी कांबळेला बनावट टीसी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तरीही तो पुन्हा अशाच प्रकारे रेल्वे प्रशासनाची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
सुमारे ५ तास चाललेल्या तपास व कारवाईनंतर, सतर्कता विभागाच्या पथकाने आरोपी हरीश कांबळे याला पुढील चौकशीसाठी कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास जीआरपीचे पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपीने यापूर्वी कोणाकोणाला गंडवले याचा सखोल तपास केला जात आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रशासनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा बनावट अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.


