. दवाखान्यातील सुविधांबाबत महापौर हर्षाली चौधरी यांचा कडक इशारा; आयुक्तांना तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश
कलम भूमी ,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिका रुक्मिणीबाई दवाखान्यात रुग्णांना दर्जेदार व तात्काळ उपचार मिळालेच पाहिजेत, असा ठाम आणि कडक आदेश महापौर हर्षाली चौधरी यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना दिला. गरजू नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा न मिळाल्यास प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
महापौर हर्षाली चौधरी यांनी आयुक्तांचे आभार मानत सांगितले की, रुक्मिणीबाई दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. विशेषतः भिवंडी व ग्रामीण भागातून अनेक महिला उपचारासाठी येथे दाखल होतात. मात्र योग्य सुविधा अभावी रुग्णांना इतर दवाखान्यात हलविण्याची वेळ येऊ नये. आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, औषधसाठा व कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले.
“निवडून आलेले सदस्य हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी आहेत. आज आम्ही महापालिकेचे नगरसेवक आहोत आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कुठलाही तडजोड स्वीकारली जाणार नाही. प्रशासनाला कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही आयुक्त गोयल यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत,” असे परखड मत महापौर हर्षाली चौधरी यांनी व्यक्त केले.
हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम शताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रुक्मिणीबाई दवाखान्यात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपायुक्त बुमकर, सचिव किशोर शेळके, नव-निर्वाचित नगरसेवक, पालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरांच्या ठाम भूमिकेमुळे रुग्णसेवेत लवकरच सकारात्मक बदल दिसून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


