कल्याण-डोंबिवलीत ‘डीप क्लिनिंग’ स्वच्छता मोहिमेला भव्य प्रारंभ
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे शहराला नवा स्वच्छतेचा संकल्प
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहर स्वच्छतेसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून, ‘डीप क्लिनिंग’ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुर्गाडी किल्ला येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या वेळी महापौर सौ. हर्षाली चौधरी (थिवळे), उपमहापौर श्री. राहुल दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गा देवीचे दर्शन घेऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
ही विशेष स्वच्छता मोहीम दि. ०९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये राबविण्यात येणार असून, शहराला स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याचा ठाम निर्धार या मोहिमेमागे आहे.
यावेळी उप आयुक्त (घनकचरा) श्री. रामदास कोकरे यांनी स्वच्छता मोहिमेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.”
तर आयुक्त श्री. अभिनव गोयल यांनी स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करत, शहराच्या शाश्वत स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
उपमहापौर श्री. राहुल दामले यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत, “निवडून आलेले नगरसेवक हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच स्वच्छ आणि सुसंस्कृत शहराची ओळख निर्माण होत आहे,” असे गौरवोद्गार काढले.
महापौर सौ. हर्षाली चौधरी (थिवळे) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपूर्ण शहर तसेच ग्रामीण भागातही ही विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवून शहराचे मानांकन उंचावण्याचे स्पष्ट आदेश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. हर्षल गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त (घनकचरा), तसेच निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा हा एकत्रित प्रयत्न नागरिकांसाठी अभिमानास्पद असून, कल्याण-डोंबिवली शहराला नवी स्वच्छ ओळख देणारा ठरणार आहे.


