नेतृत्वाचा उदय : भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांच्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात नव्या नेतृत्वाचा उदय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे गटनेते शशिकांत कांबळे यांच्या महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गटनेते शशिकांत कांबळे यांचे स्वागत केले. अनेक पदाधिकारी व समर्थकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत सन्मान व्यक्त केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले शशिकांत कांबळे यांनी राजकारणात आपला प्रवास एका साध्या कार्यकर्त्यापासून सुरू केला. संघटनात सातत्याने काम करत त्यांनी पक्षात सक्रिय जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले.
त्यांच्या मेहनती, प्रामाणिक कार्यशैली आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच कार्याचा परिणाम म्हणून २०२६ मधील कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शशिकांत कांबळे हे भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या कामाची दखल घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांची महापालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ती करून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
गटनेतेपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शशिकांत कांबळे यांच्याकडून शहराच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका, जनतेशी सातत्याने संपर्क आणि संघटन मजबूत करण्याची त्यांची कार्यशैली यामुळे शहरात नव्या नेतृत्वाची आशा निर्माण झाली आहे.
कार्यालयाच्या उद्घाटनावेळी अनेक कार्यकर्त्यांनी “नव्या पिढीचे नेतृत्व” म्हणून शशिकांत कांबळे यांचा गौरव केला. आगामी काळात शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते अधिक जोमाने काम करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
राजकीय क्षेत्रात साध्या कार्यकर्त्यापासून
गटनेतेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा मजबूत चेहरा म्हणून शशिकांत कांबळे यांच्याकडे पाहिले जात आहे.



