चिमुकलीला न्याय मिळवून देणाऱ्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची शौर्यगाथा : राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्काराने सन्मान
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीच्या निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. या अत्यंत संवेदनशील आणि भीषण गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणाऱ्या कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखालील तपासाला आता राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या प्रकरणाची निवड राज्याच्या ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कारासाठी करण्यात आली असून तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे.
३१ मे २०१८ रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला येथे पाच वर्षांच्या चिमुकलीचा थरकाप उडवणारा खून उघडकीस आला होता. घरासमोर खेळत असलेल्या निरागस मुलीला आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी मोठ्याने रडू लागल्याने घाबरलेल्या आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून आणि गळा दाबून तिची हत्या केली. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह झाडाखाली खड्डा खणून पुरून ठेवला.
या अमानुष घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी त्या वेळी नाशिक येथे कार्यरत असलेले तत्कालीन डीवायएसपी अतुल झेंडे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून वैज्ञानिक तपास पद्धतींचा वापर सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या हाडांचे नमुने आणि मुलीच्या आई-वडिलांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. अत्यंत बारकाईने पुरावे गोळा करत झेंडे यांच्या पथकाने संशयितांच्या हालचालींचा माग काढला. वैज्ञानिक तपास, सखोल चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
पुढील न्यायालयीन प्रक्रियेत पोलिसांनी भक्कम पुरावे सादर केले. झेंडे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केलेल्या काटेकोर तपासामुळे न्यायालयात आरोपीविरुद्ध ठोस पुरावे उभे राहिले आणि जिल्हा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आणि समाजात कायद्याविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला.
या संपूर्ण प्रकरणात धैर्य, संवेदनशीलता आणि व्यावसायिक कौशल्य दाखवत आरोपीला शिक्षा मिळवून देणाऱ्या पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांच्या कार्याची दखल घेत राज्याच्या गुन्हे अन्वेषण व संशोधन विभागाने या तपासाची निवड ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ पुरस्कारासाठी केली आहे.
एका निरपराध चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला हा धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न आज पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरला आहे. कायद्याच्या रक्षणासाठी जीव ओतून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्याची ही कथा समाजात न्याय आणि विश्वासाची नवी प्रेरणा देणारी ठरली आहे.


