![]() |
जागतिक महिला दिनानिमित्त आंबिवली येथे महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव |
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत आंबिवली येथील लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रात महिलांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. “महिलांना संधी दिल्यास त्या सोनं करतील” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर अॅड. हर्षाली विजय चौधरी-थविल आणि आयुक्त श्री. अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे गटनेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उपक्रमाला या कार्यक्रमात विशेष अधोरेखित करण्यात आले. डोंबिवली येथे मे २०२१ मध्ये पहिले तर आंबिवली येथे मार्च २०२३ मध्ये दुसरे लाईटहाऊस केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांमार्फत युवक-युवतींना करिअर मार्गदर्शन, जीवन कौशल्ये, कार्यक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
जानेवारी २०२६ पर्यंत सुमारे ४३०० युवक-युवतींनी या केंद्रामार्फत फाउंडेशन कोर्स पूर्ण केला असून त्यापैकी तब्बल १९१० युवक-युवतींना विविध क्षेत्रांत रोजगार मिळाला आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या महिला विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कौशल्य प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांना रोजगार मिळण्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत.
महापौर अॅड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी आत्मनिर्भर बनून समाजात नेतृत्वाची भूमिका पार पाडावी आणि आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आयुक्त श्री. अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा महानगरपालिकेचा महत्त्वाचा उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळत असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल कल्याण विभागाच्या उपआयुक्त सौ. कांचन गायकवाड यांनी केले. विद्यार्थिनींचे मनोगत, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र वितरण यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. शेवटी लाईटहाऊस संस्थेच्या प्रतिनिधी अमृता बहुलकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी समाजाने एकत्र येण्याचा संदेशही देण्यात आला.


