इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई; ब्लॅक मार्केटिंगविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस,श,रस्त्यावर
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्ष च्या पार्श्वभूमीवर देशभरात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी अनेक शहरांसह कल्याण परिसरातही गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही गॅस एजन्सी व इंधन विक्रेत्यांकडून ब्लॅक मार्केटिंग, अतिरिक्त दर आकारणी आणि कृत्रिम टंचाई निर्माण केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. नागरिकांकडून सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून कोणतीही टंचाई नसल्याचा दावा करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. पक्षाचे प्रदेश संघटक सचिव,वल्ली राजन यांनी तहसीलदारांना निवेदन देत गॅस एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की—
ग्राहकांना बुकिंगनुसार वेळेत गॅस पुरवठा करावा
होम डिलिव्हरीसाठी शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत
कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करावी
सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा
तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गॅस एजन्सींविरोधात कठोर पावले उचलली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
एकीकडे सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

