. औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद
देशातील १२ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने राहणार बंद
सरकारच्या नाकर्तेपणामुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात; केमिस्ट संघटनांचा इशारा
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : देशभरात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, नियमबाह्य सवलती आणि केंद्र सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात २० मे रोजी देशव्यापी केमिस्ट बंदची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बंदमध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे १२.५० लाख मेडिकल दुकाने सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
शिंदे यांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्ट १९४० आणि १९४५ अंतर्गत चालतो. मात्र या कायद्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर आक्षेप घेतला असतानाही केंद्र सरकार प्रभावी कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
कोरोना काळात सरकारने जीएसआर 220 (ई) अधिसूचनेद्वारे तात्पुरत्या स्वरूपात औषधांची होम डिलिव्हरी सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र महामारी संपून पाच वर्षे उलटल्यानंतरही ही तात्पुरती परवानगी मागे घेण्यात आलेली नाही. याचाच फायदा मोठ्या ऑनलाईन कंपन्या घेत असून २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत पारंपरिक मेडिकल दुकानदारांचा व्यवसाय संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला.
ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर (DPCO) २०१३ अंतर्गत जीवनावश्यक औषधांवर घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी निश्चित नफा मर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या नियम धाब्यावर बसवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे छोट्या मेडिकल दुकानदारांचे अस्तित्व धोक्यात आले असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि औषध विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय संकटात सापडल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मेडिकल दुकानदारांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या समान पर्यायी ब्रँडची औषधे देण्याचा अधिकार देण्यात यावा, अशीही मागणी संघटनांनी केली.
जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी सांगितले की, या प्रश्नावर अनेक वेळा संबंधित मंत्रालये, अधिकारी तसेच पंतप्रधान Narendra Modi यांनाही निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात बेमुदत बंद पुकारण्यात येईल तसेच मेडिकल दुकानांच्या चाव्या केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतील, असा इशाराही संघटनांनी दिला.
या पत्रकार परिषदेला ठाणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव सुरेश भट, कोषाध्यक्ष गणेश शेलके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्रात हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल असा दावा करत सरकारच्या उदासीन धोरणामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सांगितले.
