Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

अंमली पदार्थाची मोठी कारवाई यशस्वी,

 

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई; तब्बल २४ कोटी १८ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त 

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा मोठा घाव 

              कलम भूमी,कल्याण : प्रतिनिधी 

कल्याण परिमंडळ ०३ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत तब्बल २४ कोटी १८ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे हेरॉईन (गर्द) जप्त केले असून, ही कारवाई परिमंडळ ०३ मधील आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई असल्याचे मत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी व्यक्त केले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले असून, कल्याण परिसरात पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात मोठा संदेश दिला आहे.

दिनांक ०७ मे २०२६ रोजी सकाळी कल्याण पश्चिम येथील स्मशानभूमी परिसर आणि सांगळे वाडी मार्गावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपींकडून १ किलो २३६ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे “हेरॉईन” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल २४ कोटी १८ लाख ५४ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये –

१) कासिम अब्दुल सत्तार वर्डीकर (वय ३८, शाहपूर, ठाणे)

२) कृष्णा नागप्पा हक्केमणी (वय ३६, सायन कोळीवाडा, मुंबई)

यांचा समावेश आहे.

पोलिस तपासात हे आरोपी अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. दयानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या मोहिमेत अमली पदार्थ विरोधी पथकातील सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पो.हवा. देवरे, पो.शि. राहुल शिंदे, अमित शिंदे, बिरप्पन, खांडकेर व खरसाण यांनी अत्यंत धाडसी आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली.

दरम्यान, कल्याण परिसरात वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. “तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ढकलणाऱ्या अमली पदार्थ माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही,” असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.