कल्याण महानगर परिवहन महामंडळाच्या सार्वजनिक बससेवेला वेग; सहभागी शहरांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत धोरणात्मक निर्णय
कलम भूमी ,कल्याण : प्रतिनिधी ,
कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (KMPML) मार्फत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत आधुनिक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख सार्वजनिक बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक लोकप्रतिनिधी, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत बससेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (KMPML) च्या बैठकीचे अध्यक्षस्थान महामंडळाचे अध्यक्ष तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी भूषविले.
बैठकीला कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हेमलता चौधरी, भिवंडी-निजामपूरचे महापौर नारायण चौधरी, उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम, अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री कांबळे, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रविता घोरपडे यांच्यासह विविध महापालिका व नगरपरिषदांचे आयुक्त, मुख्याधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बससेवा सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय
बैठकीत शहरांमधील सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम, प्रवासी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे आहेत –
सुमारे १०० बसेसच्या ताफ्याद्वारे टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्याची तयारी.
प्रवाशांच्या सोयीसाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) लागू करण्याचा निर्णय.
डिजिटल तिकीट प्रणाली, कॅशलेस व्यवहार आणि प्रवासी माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर.
बसस्थानके, बसथांबे आणि आगारांचे नियोजन करून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास गती.
चालक-वाहक व कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया, प्रशिक्षण आणि सेवा नियम निश्चित करण्यावर चर्चा.
बसमार्गांचे वैज्ञानिक नियोजन करून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय.
नागरिकांना होणार मोठा फायदा
नवीन परिवहन व्यवस्था सुरू झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील लाखो नागरिकांना सुरक्षित, वेळेवर आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
प्रशासनाचा निर्धार
महामंडळाचे सचिव डॉ. विजयकुमार हांडे यांनी भविष्यातील कृती आराखड्याचे सादरीकरण करत बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक टप्प्यांची माहिती दिली. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अभिनव गोयल यांनी सर्व सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि विश्वासार्ह सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
सार्वजनिक वाहतुकीला नवे बळ देणारी ही बैठक भविष्यातील परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, KMPML च्या माध्यमातून आधुनिक बससेवा प्रत्यक्षात आणण्याच्या प्रक्रियेला आता अधिक वेग मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.
