Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

एक लाखांचा दंड


 टिटवाळ्यात कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष महागात; 'रेजन्सी सर्वम' गृहनिर्माण संस्थेला केडीएमसीचा एक लाखांचा दंड

कल्याण : कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या टिटवाळा परिसरातील मे. रेजन्सी सर्वम या गृहनिर्माण संस्थेविरुद्ध कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर कारवाई करत रु. १ लाखांचा दंड ठोठावला आहे. कचरा प्रक्रिया केंद्र वारंवार बंद ठेवणे, परिसरातील ओला-सुका कचरा जागेवरच साचू देणे तसेच नियमांनुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेला या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. कचरा प्रक्रिया केंद्र अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरात अस्वच्छता वाढत असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची माहिती तक्रारींमधून समोर आली होती.

या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले. उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 'अ' प्रभाग क्षेत्र कार्यालयातील स्वच्छता अधिकारी सनी जाधव, स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे, भरत पाटील व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित गृहनिर्माण संस्थेची तपासणी केली.

पाहणीदरम्यान संस्थेचे कचरा प्रक्रिया केंद्र पूर्णपणे बंद असल्याचे आढळून आले. तसेच परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जागेवर प्रक्रिया न करता तो उघड्यावर साचू दिल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले. यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

महापालिकेच्या माहितीनुसार, शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ नुसार मोठ्या गृहनिर्माण संस्था व निवासी संकुलांनी आपल्या परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

महत्त्वाचे म्हणजे, संबंधित गृहनिर्माण संस्थेला यापूर्वीही महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीस देऊनही नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने कठोर भूमिका घेत कचरा प्रक्रिया न करणे आणि उघड्यावर कचरा टाकणे या कारणांवरून रु. १ लाखांचा दंड आकारला.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले आणि विकासकांनी घनकचरा व्यवस्थापनाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कठोर दंडात्मक कारवाई सुरू राहणार असून, स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरासाठी नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे टिटवाळा परिसरातील इतर गृहनिर्माण संस्थांनाही कचरा व्यवस्थापनाबाबत अधिक दक्ष राहण्याचा इशारा मिळाला असून, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता राखण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या महापालिकेच्या भूमिकेला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.