Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सत्ताधाऱ्यांवर टीका

 

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीचा आरोप; प्रशासनाच्या  भूमिकेवर प्रश्नचिन्ह, सत्ताधाऱ्यांवर टीका 

               कलम भूमी,, कल्याण प्रतिनिधी 

कल्याण : डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी रात्री घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी समर्थकांसह रुग्णालयात जाऊन कर्तव्यावर असलेल्या महिला व पुरुष डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घटना घडून सुमारे १८ तास उलटून गेल्यानंतरही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित डॉक्टरांच्या संरक्षणासाठी किंवा दोषींविरोधात कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई केल्याचे दिसून आले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे याच पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकावर डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप होत असताना, याबाबत त्यांची कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आली नसल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. "सामान्य नागरिकांवरील अन्यायाविरोधात भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर आरोप झाल्यास मौन का बाळगतात?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून किंवा राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाण, दमदाटी आणि कामात हस्तक्षेपाच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला होणे ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याची भावना डॉक्टर संघटनांनी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आणि महापालिका प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, तसेच आरोपांबाबत संबंधित नगरसेवक आणि शिंदे सेनेची प्रतिक्रिया काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.