Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रशासनाचा दणका,

 

फेरीवाला हटाव मोहिमेत कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन; प्रशासनाचा दणका, तरीही बेकायदा फेरीवाल्यांची दादागिरी कायम 

             कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने फेरीवाला हटाव मोहिमेच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरासह सार्वजनिक रस्ते व पदपथांवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्यात कसूर केल्याप्रकरणी ग प्रभागातील कमलाकर सोनवणे आणि रवी बर्वे या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबित केले आहे.

महापौर अॅड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार विविध प्रभागांत कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. यामुळे नागरिकांना पायी चालणेही अवघड होत असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

या पार्श्वभूमीवर कामात निष्काळजीपणा व आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांमध्ये मात्र संतापाची भावना कायम आहे. पालिकेच्या वारंवार कारवायांनंतरही अनेक अनधिकृत फेरीवाले राजरोसपणे कायद्याला न जुमानता रस्ते आणि पदपथांवर व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. कारवाई झाल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करतात, त्यामुळे प्रशासनाच्या मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. फेरीवाल्यांना संरक्षण देणारे, कारवाईनंतर पुन्हा त्यांना बसू देणारे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज होणारा त्रास कायम राहणार आहे.

पालिकेने आता फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून कायद्याचा धाक निर्माण करणे आणि नागरिकांसाठी पदपथ व रस्ते मोकळे ठेवणे हीच काळाची गरज असल्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.