लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केडीएमसीत अभिवादन; साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी विचारांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिका सचिव किशोर शेळके, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त सुषमा मांडगे, कार्यकारी अभियंता संदीप तांबे, सांगळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहायक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर कल्याण (पश्चिम) येथील लाल चौकी परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर ॲड. हर्षाली चौधरी, स्थानिक नगरसेविका विजया ताई पोटे, उपआयुक्त सुषमा मांडगे आणि सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
समाजातील वंचितांना आवाज देणारे लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते जनतेच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहीर होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाचा अभाव असूनही आपल्या लेखणीतून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि दुर्लक्षित घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्यातून सामाजिक समता, मानवी स्वाभिमान, अन्यायाविरुद्धचा लढा आणि परिवर्तनाचा संदेश ठळकपणे दिसून येतो.
त्यांनी कादंबरी, कथा, लोकनाट्य, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. 'फकिरा' ही त्यांची गाजलेली कादंबरी मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते. त्यांच्या साहित्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही मान्यता मिळाली आहे.
विचार आजही तितकेच प्रेरणादायी
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. अत्यंत दारिद्र्यातून संघर्ष करत त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्यविश्वात अजरामर स्थान निर्माण केले. "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा त्यांचा विचार आजही श्रम, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देतो
त्यांच्या लेखणीतून समाजातील विषमता, जातीय अन्याय, गरिबी आणि शोषणाविरोधात बुलंद आवाज उठला. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
जयंतीनिमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचा संदेश देण्यात आला.


