डोंबिवलीत शिंदे सेना–भाजपमध्ये पक्षवाढीसाठी जोरदार रस्सीखेच; युवा सेनेच्या २५ पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, नागरिकांमध्ये संभ्रम
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी सुरू असलेली रस्सीखेच दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे महायुतीचा भाग असल्याचे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे एकमेकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
डोंबिवली येथील भाजप कार्यालयात कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि केडीएमसीतील भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेशी संबंधित सुमारे २५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युवा सेनेचे विधानसभा समन्वयक अर्चित खडकुळ यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी अर्चित खडकुळ यांनी सांगितले की, युवा कार्यकर्त्यांबाबत पक्षातील काही निर्णयांमुळे नाराजी वाढत होती. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी यावेळी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत आहे. पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पक्षवाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपमध्ये दाखल झालेल्या युवा कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनीही भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवलीतील हा प्रवेश भाजपची वाढती ताकद दर्शवणारा असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी भाजपने महायुती धर्माचा भंग झाल्याचा आरोप केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपच प्रथम कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला होता. आता युवा सेनेतील २५ पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.
महायुतीत असूनही सुरूच पक्षवाढीची स्पर्धा
राजकीय निरीक्षकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने दोन्ही पक्षांकडून संघटन विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे एकमेकांच्या प्रभावी कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये अशी उघड स्पर्धा सुरू राहिल्यास भविष्यात स्थानिक पातळीवर मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
दरम्यान, एकीकडे महायुती म्हणून एकत्र असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे त्याच महायुतीतील पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची ओढाताण सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासाच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्याऐवजी पक्षवाढ आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, कार्यकर्त्यांच्या प्रवेश-निर्गमनापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शहर विकासाच्या प्रश्नांवर महायुतीतील पक्षांनी अधिक लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. अन्यथा सुरू असलेल्या या रस्सीखेचीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होतील, मात्र नागरिकांचा संभ्रम आणि राजकीय अविश्वास अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
