Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

 

५० क्षयरुग्णांची पोषणाची जबाबदारी स्वीकारत रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम 

‘निक्षय मित्र’ म्हणून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा पुढाकार; सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

             कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी 

डोंबिवली, दि. २२ ऑगस्ट २०२६ : क्षयरोगमुक्तभारताच्या संकल्पनेला बळ देतानाच क्षयरुग्णांच्य उपचार प्रक्रियेत समाजाचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने सामाजिक बांधिलकीचे अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे. ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेत रोटरी क्लबने तब्बल ५० क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली असून, या रुग्णांना नियमितपणे आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. रोटरी क्लबच्या या संवेदनशील आणि समाजाभिमुख भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

क्षयरोग हा केवळ वैद्यकीय आजार नसून त्याचा रुग्णांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक जीवनावरही मोठा परिणाम होत असतो. क्षयरोगाच्या उपचारामध्ये नियमित औषधोपचाराबरोबरच रुग्णांना पौष्टिक आहार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने शासनाच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हातभार लावण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमांतर्गत २१ ऑगस्ट रोजी रोटरी भवन, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, डोंबिवली पूर्व येथे ‘निक्षय मित्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधोपचारासोबत पौष्टिक आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांनी उपचाराचा संपूर्ण कालावधी पूर्ण करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

‘तुम्ही एकटे नाही, समाज तुमच्या सोबत आहे’ — रोटरी क्लबचा संदेश

रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अथर्व जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, निक्षय मित्र म्हणून स्वीकारलेला हा उपक्रम केवळ क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यापुरता मर्यादित नाही. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनात ‘तुम्ही एकटे नाही, समाज तुमच्या सोबत आहे’ हा विश्वास निर्माण करणे हीदेखील या उपक्रमाची महत्त्वाची बाजू आहे.

समाजाचा सकारात्मक सहभाग मिळाल्यास क्षयरुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी मानसिक बळ मिळते. तसेच क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठीही अशा उपक्रमांची मोठी मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. क्षयरोगमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केवळ शासकीय यंत्रणेचे प्रयत्न पुरेसे नसून सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह आणि नागरिकांनीही पुढे येणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

‘निक्षय मित्र’ म्हणून क्षयरुग्णांना पोषण आहार तसेच आवश्यक ते इतर सहाय्य देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. शुक्ला यांनी केले.

आरोग्य विभागाची उपस्थिती

या कार्यक्रमास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल पाटील तसेच क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असून, गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची परंपरा या संस्थेने कायम ठेवली आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय ५० क्षयरुग्णांची पोषणाची जबाबदारी स्वीकारण्याच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा आला आहे.

क्षयरोग निर्मूलनाच्या लढ्याला सामाजिक बळ

क्षयरोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांना पुरेसा पोषण आहार मिळणे, मानसिक आधार मिळणे आणि समाजाकडून सकारात्मक वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे रोटरी क्लबने घेतलेला हा पुढाकार क्षयरोग निर्मूलनाच्या व्यापक लढ्याला निश्चितच बळ देणारा ठरणार आहे.

५० क्षयरुग्णांची पोषणाची जबाबदारी स्वीकारून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. शासनाच्या आरोग्यविषयक प्रयत्नांना सामाजिक संस्थांनी दिलेली अशी साथ निश्चितच प्रेरणादायी आहे. रोटरी क्लबच्या या संवेदनशील भूमिकेमुळे क्षयरुग्णांना पोषणासोबतच मानसिक आधार आणि आत्मविश्वास मिळणार असून, त्यांच्या उपचार प्रक्रियेलाही सकारात्मक बळ मिळणार आहे.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या या उल्लेखनीय सामाजिक योगदानाचे आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसह सर्वच स्तरातून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही रोटरी क्लबचे या उल्लेखनीय सामाजिक बांधिलकीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.