२२ जुलैला राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात भव्य आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन
कल्याण भूमी, कल्याण प्रतिनिधी,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे येत्या २२ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्ताच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनतो, यामुळे राज्यभरातून इच्छुकांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, कल्याण शहर भाजप, तसेच माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये आयोजित भव्य आरोग्य सेवा शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, औषधवाटप आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “२२ जुलै रोजी भाजपतर्फे राज्यातील प्रत्येक मंडलात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक बांधिलकी जोपासत या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरी वाढदिवसाची भेट ठरेल.”
कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारतीय जनता पार्टी समाजसेवेचे व्रत घेऊन काम करत असून जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचे काम पक्ष सातत्याने करतो. आरोग्य सेवा शिबिराच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवणे, हेच पक्षाचे खरे जनसेवेचे स्वरूप आहे.”
“पक्ष माझा स्वाभिमान, पक्ष माझा अभिमान, पक्ष माझा श्वास आणि पक्ष माझा विश्वास या भावनेने कार्य करणारे कार्यकर्तेच पक्षाचा खरा चेहरा आहेत,” असे गौरवोद्गारही कपिल पाटील यांनी काढले.
कल्याणमध्ये भरवण्यात येणाऱ्या या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, विविध तपासण्या आणि उपचार यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, कल्याण परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

