कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा मोठा प्रहार
संघटित टोळीचा पर्दाफाश; महिला व मुख्य सूत्रधारासह अनेकांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराच्या रॅकेटवर कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आधीच दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी या रॅकेटचा विस्तार उघडकीस आणला असून, टोळीतील महिला सदस्यांसह मुख्य सूत्रधाराविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे २०२६ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत कारवाई करत पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये एका महिला आरोपीसह अन्य सदस्यांचा समावेश होता.
महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलले
तपासादरम्यान आरोपी महिलांना आर्थिक प्रलोभन देऊन देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. त्यानंतर ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातून स्वतः आर्थिक लाभ मिळवत महिलांचे शारीरिक शोषण करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या संपूर्ण रॅकेटमधून आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित स्वरूपात गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे स्पष्ट झाले.
मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर
या गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केल्यानंतर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कल्याण परिमंडळातील या प्रकरणात मोक्का लागू करण्यात आला.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, टोळीशी संबंधित आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी व तपास पथकाने संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक होनमाने करीत आहेत.
या कारवाईमुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराच्या संघटित रॅकेटला मोठा धक्का बसला असून, अशा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
