विज्ञानाच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली पिढी घडविण्याचा संकल्प
सेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्टच्या विज्ञान सप्ताह व प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; अध्यक्ष प्रकाशजी मुथा यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड, पर्यावरणाबाबत संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने सेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्टद्वारे संचलित सेठ हिराचंद मुथा स्कूल (सीबीएसई) येथे आयोजित "विज्ञान सप्ताह व अंतरविद्यालयीन विज्ञान प्रदर्शन" उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमाला कल्याणसह मुंबई आणि उपनगरातील अनेक शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी मुथा यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे हा उपक्रम केवळ विज्ञान प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील संशोधक, वैज्ञानिक, कलाकार आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य या उपक्रमातून प्रभावीपणे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अशोक हनुमानजी (असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस) होते. तसेच ट्रस्टच्या सन्माननीय लेखाकार अन्वेषा मुथा, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सपना गाडिया, उपमुख्याध्यापिका सौ. दिपाली कांबळे तसेच कल्याण शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात्मक कल्पना, प्रयोग आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये विज्ञानाबरोबरच पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, पुनर्वापर, भारतीय संस्कृती, कला, सामाजिक जबाबदारी आणि नवकल्पना यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
विज्ञान सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांमध्ये वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पक्ष्यांसाठी धान्यपात्र निर्मिती, मातीची भांडी सजावट, पोस्टर स्पर्धा, वर्ग सजावट, बोर्ड सजावट, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींचे प्रात्यक्षिक, निसर्गचित्र प्रदर्शन, स्वच्छता जनजागृती, खाद्य संस्कृती, दिव्यांपासून कासव तयार करणे, कापडी पिशव्या तयार करून रंगकाम, मानवी अवयवांची प्रतिकृती निर्मिती, यंत्रमानवाचे प्रात्यक्षिक, शिल्प प्रदर्शन तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे उपक्रम विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सादर केले.
या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. सुमारे ७०० हून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे भरभरून कौतुक केले. अनेक पालकांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणारा आदर्श प्रयोग असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन आणि नवकल्पनांमधूनच सक्षम भारताची निर्मिती होणार आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, समस्या सोडविण्याची क्षमता, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते.
सेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशजी मुथा यांनी नेहमीच आधुनिक शिक्षणासोबत संस्कार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांचा समतोल राखणाऱ्या शिक्षणपद्धतीवर भर दिला आहे. विद्यार्थी केवळ परीक्षेत गुण मिळवणारे नसून सक्षम, स्वावलंबी, संशोधक वृत्तीचे आणि समाजाप्रती उत्तरदायी व्यक्तिमत्त्व म्हणून घडावेत, ही त्यांची शिक्षणाविषयीची भूमिका या विज्ञान सप्ताहातून पुन्हा अधोरेखित झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. सपना गाडिया, उपमुख्याध्यापिका सौ. दिपाली कांबळे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविणारा हा विज्ञान सप्ताह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, कल्याणच्या शैक्षणिक क्षेत्रात सेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्टने आणखी एक आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






